Lesson 4:- Question sentences | LEARN ENGLISH
प्रश्नार्थी वाक्ये
या प्रकरणाच्या अभ्यासानंतर इंग्रजीमधे प्रश्न विचारणं तुमच्यासाठी कठीण राहणार नाही. तसं इंग्रजीमधे प्रश्न विचारणं कठीण नाही सुद्धा. कारण इंग्रजीमधे प्रश्नार्थी वाक्ये सुरू होतातच फक्त दोन प्रकारे :
१) साहाय्यकारी क्रियापदापासून – म्हणजे जसं, do, does, is, was, can, could अशा शब्दांपासून किंवा
२) प्रश्नार्थी शब्दापासून – म्हणजे जसं, what, when, where, why, how अशा शब्दांपासून.
याचा अर्थ तुम्ही इंग्रजीमधे कधीही प्रश्न विचाराल तर तुमचं वाक्य एक तर साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होईल किंवा प्रश्नार्थी शब्दापासून.
आता इंग्रजीचं प्रश्नार्थी वाक्य साहाय्यकारी क्रियापदाने केव्हा सुरू करायचं आणि प्रश्नार्थी शब्दाने केव्हा ते पहा :-
मराठीत प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी ‘का’ हा शब्द असला तर ते वाक्य इंग्रजीमधे साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू करायचं. म्हणजे,
• तू येशील का?
• तू जाशील का?
• तुला आवडलं का?
• तुला समजलं का?
ही वाक्ये इंग्रजीमधे साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होतील. आणि मराठीत प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटचा शब्द ‘का’ नसेल तर ते वाक्य इंग्रजीमधे प्रश्नार्थी शब्दापासून सुरू करायचं. म्हणजे,
• तू केव्हा येशील?
• तू केव्हा जाशील?
• तुला काय आवडलं?
• तुला काय समजलं?
ही वाक्ये प्रश्नार्थी शब्दापासून सुरू होतील.
मराठीत प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी जेव्हा ‘का’ हा शब्द असतो तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं देता येतं. यावरून वरील माहिती दुसऱ्या शब्दात अशीही सांगता येईल.
प्रश्नाचे उत्तर ‘हो किंवा नाही’ असे देता येत असल्यास त्या प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात इंग्रजीमधे साहाय्यकारी क्रियापदापासून होते.
आणि प्रश्नाचे उत्तर ‘हो किंवा नाही’ असे देता येत नसल्यास त्या प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात इंग्रजीमधे प्रश्नार्थी शब्दापासून होते.
प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात साहाय्यकारी क्रियापदाने केव्हा करायची व प्रश्नार्थी शब्दाने केव्हा ते आपण दोन प्रकारे लक्षात घेतलं.
तुम्हाला जसं सोपं वाटलं तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हे लक्षात ठेवता ठेवता तुम्हाला या माहितीप्रमाणे वाक्ये करण्याची एकदा सवय झाली की मग लक्षात न ठेवताच हे तुमच्या लक्षात राहील.
इथपर्यंत प्रश्नार्थी वाक्यांबद्दल आपण शिकलो :-
• प्रश्नार्थी वाक्ये इंग्रजीमधे दोन प्रकारे सुरू होतात. एक साहाय्यकारी क्रियापदाने व दुसरं प्रश्नार्थी शब्दाने.
• मराठीत प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी ‘का’ असेल तर इंग्रजीचं वाक्य साहाय्यकारी क्रियापदाने सुरू होईल व शेवटी का’ नसेल तर इंग्रजीचं वाक्य प्रश्नार्थी शब्दाने सुरू होईल.
आता साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणाऱ्या व प्रश्नार्थी शब्दापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थी वाक्यांच्या रचना आपण एकानंतर एक लक्षात घेऊ.
तीला साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होणाऱ्या प्रश्नार्थी वाक्याची रचना :
साहाय्यकारी क्रियापद + कर्ता + क्रियापद + ………?
आतापर्यंत कुठल्याही रचनेत आपण फक्त क्रियापद असं लिहिलं नव्हतं. क्रियापदाच्या नेमक्या रूपाचा आपण उल्लेख करत होतो. पण वरच्या रचनेत आपण क्रियापदाचं नेमकं कितवं रूप ते लिहू शकलो नाही कारण प्रश्नार्थी वाक्य कुठल्याही काळाचं असू शकतं. तेव्हा आपल्याला परिस्थितीनुसार आणि वाक्यानुसार क्रियापदाचं योग्य रूप वापरावं लागेल.
उदाहरणे :
१) तू येशील का?
या प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी ‘का’ आहे. या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही’ असं देता हे वाक्य इंग्रजीमधे साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होईल. वाक्य साध्या भविष्यकाळाचं असल्यामुळे will हे साहाय्यकारी क्रियापद येईल.
मग पहा इंग्रजीचं वाक्य :-
Will you come?
सा.क्रि. + कर्ता + क्रि …..?
मराठीत बोलताना आपण कधी या शेवटच्या का’ची जागा बदलतो. जस हाच प्रश्न आपण मराठीत येशील का तू?’ असा विचारू शकतो. आता या वाक्यात शेवटी ‘का’ दिसत नसलं तरी शेवटी ‘का’ असलेल्या प्रश्नासारखाच याचा अर्थ आहे. शिवाय ‘येशील का तू?’ या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही’ असं देता येतं. अशा प्रश्नाची सुरुवात अर्थातच साहाय्यकारी क्रियापदापासून होईल.
१) येशील का तू? Will you come?
२) तू जाशील का? Will you go?
३) तू जात आहेस का?
या प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी पण ‘का’ आहे. म्हणून इंग्रजीचं वाक्य साहाय्यकारी क्रियापदापासून सुरू होईल हे निश्चित.
साहाय्यकारी क्रियापद आपल्याला अंदाजाने वापरण्याची गरज नाही. कारण आपल्याला वाक्याचा काळ समजतो, वाक्याची परिस्थिती समजते. हे वाक्य चालू वर्तमानकाळाचं आहे.
चालू वर्तमानकाळात am/is/are ही साहाय्यकारी क्रियापदे येतात असं आपण शिकलो. म्हणून हे वाक्य am/is/are पासून सुरू होईल आणि पुढे क्रियापदाला ing लागेल (चालू वर्तमानकाळाच्या रचनेनुसार).
इंग्रजीचे वाक्य :-
Are you going?
सा.क्रि. + कर्ता + क्रियापद ….?
४) तू येत आहेस का? Are you coming?
५) तो आला आहे का? Has he come?
६) तो गेला आहे का? Has he gone? भेटू का?
साहाय्यकारी क्रियापदापासून सुरु होणाऱ्या प्रश्नार्थी वाक्ये
१) मी तुला ही खोली स्वच्छ करून देऊ का? -Shall I clean this room for you?
२) ही दोरी इतकं वजन सांभाळेल का? – Will this rope hold this much weight?
३) मी तुला स्टेशनवर घ्यायला येऊ का? – Shall I come to receive you at the station?
४) तू हे करशील का? Will you do this?
५) तो इथे येईल का? Will he come here?
६) तू इथे सरळ स्टेशनवरून येत आहेस का? – Are you coming here straight from the station?
७) तू अद्याप त्याच कंपनीसाठी काम करत आहेस का?-Are you still working for the same company?
८) तू खरं सांगत आहेस का? – Are you telling the truth?
९ ) तू हे ऐकलं आहे का? – Sara Have you heard this?
१०) टपाल आलंय का? – Has the post come?
११) तू माझा पेन कुठे पाहिला आहे का? – Have you seen my pen anywhere?
१२) या पुस्तकाने तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत का? – Has this book fulfilled your expectations?
१३) तू अशी परिस्थिती आधी हाताळली आहे का?- Have you handled such a situation before?
१४) आपण आता मीटिंग सुरू करायची का? – shall we start the meeting now?
१५) टीव्हीचा आवाज कमी करू का? – Shall I turn down the volume of the TV?
१६) तुम्ही तुमच्या मुलाला घड्याळ पहायला शिकवलंय का? – Have you taught your son to tell the time?
१७) आपण इथे बसायचं का?- Shall we sit here?
१८) आपण आता थांबायचं का?- Shall we stop now?
हेच व्यवस्थित लक्षात घेण्यासाठी पुढच्या काही वाक्यांकडे लक्ष द्या :-
१) तो इथे येत असेल का? – Will he be coming here?
२) तो तिथे गेला असेल का? – Will he have gone there?
३) ते तिथे पोहोचले असतील का? – Will they have reached there?
४) तू बऱ्याच वेळेपासून वाट पाहत (आलेला) आहेस का? – Have you been waiting (for) long?